सह्याद्रीच्या किंवा सातपुड्याच्या कुठल्याही उपत्यर्फेत उभे राहावें, आणि एकवार या श्रेष्ठ पर्वतराजीकडे नजर टाकावी. ठेंगण्याठुसक्या टेकड्यांच्या दार्टीतून मस्तक वर काढून भवताली डोळेभरी पाहात असलेलीं किती तरी पर्वतशिखरें आपल्या दृष्टीस पडूं शकतील.

हे सारे कडे चढायला अतिदुर्गम असतात. मग कुणीतरी पुरुषार्थी मावळा वर चढून, जिवाच्या कसोशीवर कड्याच्या टोकाला शेंदूर लावून येतो. तेंही एक यात्रेचें ठिकाण बनते. कुणी तळहात शिर घेणारा भगत दरवर्षी वर चढतो. कुण्या वेलाच्या आश्रयानें. तो त्या दिवशी वर दिवली किंवा टेंभा लावून येतो. तेवढाच त्या दैवताजवळचा दीपोत्सव. अशी कितीतरी दैवते या भागांत पसरलेली आहेत.

महाराष्ट्रांत जसे कडे आहेत, तशा कपारीही आहेत. दप्या आहेत, दरकुटेंही आहेत. विशेषतः पश्चिम घाटाच्या माथ्यावर उभे राहावें, अन् खालीं कोकणांत दृष्टि घालावी, तर मन क्षणभर विस्मयचकित होर्ते. असे वाटतें, की या दऱ्या नव्हेतच. हें आहे कुण्या मगरीनें पसरलेलें मुख. खालीं लांबपर्यंत पसरलेल्या टेकड्या हे मगरीचे दांत आहेत. तुटलेले कडे, या विकराळ दाढा आहेत. यांत दाटलेले धुर्के हें अनादिकाळापासूनचे भय आहे. असे क्षणभर थक्किन होऊन आपण उभे राहातों-आणि पाहातों. या प्रचण्ड दऱ्या, कडे, कपारी, शिखरें, पाणलोट, मैदानें, माळरानें, खाड्या, खाजणे, रांजण-महाराष्ट्राचें प्राकृतिक वैभव असें नाना पचें आहे. या सर्वोवरून वाजत गाजत येतात आणि निघून जातात प्रकृतीचे तीन पुत्र- उन्हाळे, हिंवाळे आणि पावसाळे.